मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाना पटोलेंची निवड करण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी कालच राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासात नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
२०१९ च्या निवडणुकीपूर्वी अचानक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आलेल्या बाळासाहेब थोरात यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तसंच, विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळं त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसमधून होत होती. गेले काही दिवस या पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव यांचेही नाव यात होते. अखेरच्या क्षणी अमित देशमुख यांचंही नाव पुढं आलं होतं. मात्र, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरच ही जबाबदारी येणार हे स्पष्ट झालं होतं. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं.