ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यात ११ केंद्रावर ७३ हजार ३१७ क्विंटल विक्रमी मका खरेदी, सर्वात जास्त करमाळा केंद्रावर खरेदी

 

सोलापूर, दि. ७ : जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ११ खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून तब्बल ७३ हजार ३१७ क्विंटल मका खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी भास्कर वाडीकर यांनी दिली आहे. सर्वात जास्त करमाळा केंद्रावर १३ हजार ६७५ क्विंटल मका खरेदी झाली आहे.

शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळण्यासाठी जिल्ह्यात अकलूज, बार्शी, करमाळा, कुर्डुवाडी, मंगळवेढा, मरवडे, नातेपुते, पंढरपूर, अनगर, सांगोला आणि माळकवठे अशी ११ मका खरेदी केंद्रे उघडण्यात आली होती. एनईएमएल पोर्टलवर ६५३९ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ४७८२ शेतकऱ्यांना एसएमएस पाठवून खरेदीसाठी बोलावण्यात आले होते. ३० नोव्हेंबर २०२० पासून मका खरेदी सुरू झाली होती. ३०९५ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष मका खरेदी केंद्रांवर आणली.

जिल्ह्यात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उद्दिष्ट वाढवून देण्याची विनंती शासनाकडे केली होती. त्यानुसार जिल्ह्याला ७३ हजार ३६५ क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट मिळाले होते. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने सब अजेंट संस्थेकडून मका खरेदीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

जिल्ह्यात एकूण १३ कोटी ५६ लाख ३७ हजार ३७५ रुपयांची मका खरेदीतून उलाढाल झाली. ९ कोटी ८१ लाख ५९ हजार १५० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली असून उर्वरित रक्कम शासनाकडून प्राप्त होताच देण्यात येणार आहे. शासकीय हमीभाव योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. वाडीकर यांनी केले आहे.

अकलूज केंद्रावर ३६६ शेतकऱ्यांकडून ८४०० क्विंटल मका खरेदी केली आहे. या पद्धतीने इतर केंद्रावरील मका खरेदी अशी आहे, बार्शी-१२५ शेतकरी, २२००
क्विंटल, करमाळा- ६२७ शेतकरी, १३५७५.५० क्विंटल, कुर्डुवाडी-३३३ शेतकरी, ८३०० क्विंटल, मंगळवेढा- ३११ शेतकरी, ७४१७.५० क्विंटल, मरवडे- १११ शेतकरी, २५०० क्विंटल, नातेपुते- २२२ शेतकरी, ५२०० क्विंटल, पंढरपूर- २९९ शेतकरी, सहा हजार क्विंटल, अनगर- ३१० शेतकरी, १०४८५.५० क्विंटल, सांगोला- २३६ शेतकरी, ५४०० क्विंटल आणि माळकवठे- १५५ शेतकरी, ३७३९ क्विंटल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!