मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद आता खुले झाले आहे, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असतानाच पटोले यांनी आज त्यावर परखड मत मांडलं.
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. :काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक १ चा पक्ष बनवून दाखवेन, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा व्यक्त केला. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर नाना पटोले माध्यमांशी बोलत होते.
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि काँग्रेसकडेच राहील. काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणाला अध्यक्ष करायचे याचा निर्णय घेतील, असेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले असून एकप्रकारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानालाच पटोले यांनी छेद दिला आहे. पटोलेंच्या राजीनाम्यानंतर हे पद आता खुले झाले आहे, असे पवार म्हणाले होते