सोलापूर: राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा वाढला आहे. मागील आठवड्याभरापासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली असल्याने चिंतेत भर पडली आहे. दरम्यान राज्यातील शाळा, धार्मिक स्थळे पुन्हा बंद करण्याची स्थिती आहे. पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले असून आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांना परत जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. भाविकांनी परत जावे अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली होती. मात्र पुन्हा रूग्ण वाढू लागल्याने गर्दी होऊ नये यासाठी भाविकांना परत जाण्याचे सांगितले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नाही मात्र खबरदारी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. रुग्ण संख्या वाढल्यास लॉकडाऊन करावे लागेल असेही त्यांनी सांगितले होते.