पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पुण्यात उद्या सोमवारपासून लॉकडाउन लागणार असल्याची चर्चा होती. अखेर यावर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पुण्यात १५ दिवस लॉकडाउन लावण्यात आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला, यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरिकांमध्ये संभ्रम वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अशाप्रकारच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
सुरुवातीला जेव्हा लॉकडाउन लागले होते तेंव्हाचा हा जुन्या व्हिडिओ व्हायरल केला गेला असल्याचे उघड झाले आहे. हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाइल क्रमांक तसेच ग्रुपचे नाव, स्क्रीन शॉट पाठवल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे. कृपया कोणीही अशाप्रकारे अफवा पसरवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.