दिल्ली,दि.२९ : देशात काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत, ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसोबत नाहीत किंवा सैनिक आणि तरुणांच्या सोबत नाहीत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना केली आहे.नमामि गंगे मोहिमेअंतर्गत सहा मोठ्या योजनांचा दूरदृश्य संवाद पद्धतीने प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. नमामि गंगे अभियान हे देशातील सर्वात मोठे अभियान असून त्या माध्यमातून नदी संरक्षणाची कामे केली जात आहेत.
कृषी सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक हे स्वतः शेतकरी विरोधक आहेत.या नव्या कायद्यामुळे काळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे ते या कायद्याला विरोध करत आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.