ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिर्डीचे साईमंदिर सुरुच; मात्र ‘ही’ गोष्ट आवश्यक !

शिर्डी:राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदीरे पुन्हा बंद करण्यात आली आहेत. मात्र, शिर्डीचे साईमंदीर खुलेच ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. मंदीरात येण्यापूर्वी बुकिंगशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मास्कची सक्ती आणि पूजा साहित्य मंदिरात नेण्यास बंदी करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार 16 नोव्हेंबर 2020 पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी, शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अदयाप करोनाचे सावट संपलेले नाही. सध्या करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व साईभक्तांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. दर्शनाकरीता ठराविक संख्येनेच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून सलग दोन किंवा जास्त दिवस सलग सुट्टी आल्याच्या काळात, तसेच गुरुवार, शनिवार, रविवार व सरकारी सुट्टी अथवा महत्वाचे धार्मिक दिवशी ऑनलाइन पास सक्तीचे आहेत. या काळात येताना भाविकांनी संस्थानच्या संकेतस्थळावरुन आगाऊ ऑनलाईन दर्शनपास घेऊनच यावे. पास निश्चित झाल्यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. या वेबसाईटव्दारे सशुल्क दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील पाच दिवसांसाठी तसेच मोफत दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल, असेही संस्थानतर्फे सांगण्यात आले.

मास्कचा वापर न करण्या-या साईभक्तांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. दहा वर्षांखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व 65 वर्षांवरील व्यक्तींनाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पुजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. जे साईभक्त आजारी आहेत अशा साईभक्तांनी दर्शनाकरीता येऊ नये. सर्व साईभक्तांनी आपली होणारी गैरसोय टाळण्याकरीता ऑनलाईन दर्शनपास उपलब्ध करुन निर्धारीत वेळेत दर्शनासाठी शिर्डीत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!