नवी दिल्ली: देशात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मार्चपासून आता ज्येष्ठ नागरिकांनाही लस दिली जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे असेही त्यांनी जाहीर केले आहे.
1 मार्चपासून 60 पेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ आणि इतर व्याधी असणारे 45 हून अधिक वय असणारे नागरिक यांचे लसीकरण केले जाणार आहे. 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांवर हे लसीकरकण होईल. ही लस देण्याचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. पण ज्यांना खासगी रुग्णालयातून लस घ्याची आहे, त्यांना पैसे भरावे लागतील. ही रक्कम किती असेल याचा निर्णय लवकरच आरोग्य मंत्रालय घेईल, असेही जावडेकर म्हणाले. त्यासाठी अजून चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. रक्कम निश्चितीबाबत आरोग्य मंत्रालय, रुग्णालये व लस उत्पादक यांची चर्चा सध्या सुरू आहे.