मुंबई : देशातील पेट्रोल-डीझेलची वाढती किंमत सर्वसामान्यांना चटका लावते आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावरून केंद्र सरकारवर टीका देखील होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. मात्र आज गुरुवारी सलग दुसर्या दिवशीही पेट्रोलचे दर स्थिर आहेत. मात्र ब्रेंट क्रूडचा भाव मागील 13 महिन्यातील सर्वाधिक उच्चांकावर पोहोचला आहे. जागतिक बाजारात इंधन दरात तेजी आहे. तर चलन बाजारात डॉलरसमोर रुपयाचे अवमूल्यन सुरु असल्याने पेट्रोलियम कंपन्यांना इंधन आयातीसाठी जादा खर्च करावा लागत आहे. गुरुवारी चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 72.35 वर बंद झाला होता. त्यात 11 पैशांची वाढ झाली होती.
ब्रेंट क्रूडचा भाव 2.97 टक्क्यांनी वधारला असून तो प्रती बॅरल 67.31 डॉलर इतका झाला आहे. मागील 13 महिन्यातील हा सर्वाधिक दर आहे. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसर्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत.
आज गुरुवारी मुंबईत पेट्रोल 97.34 तर डिझेलचा भाव 88.44 रुपये आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक 99.45 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 90.93 रुपये आहे. डिझेलचा भाव 81.32 रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव 92.90 रुपये झाला आहे. डिझेलसाठी 86.31 रुपये भाव आहे.
कोलकात्यात पेट्रोल 91.12 तर डिझेल 84.20 रुपय आहे. बंगळुरात पेट्रोल 93.98 रुपये असून डिझेल 86.21 रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक 89.60 रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर 98.96 रुपये आहे.