मारुती बावडे
अक्कलकोट, दि. ८ : ये मत कहो खुदा से, मेरी मुष्कीले बडी है, इन मुष्कीलो से कह दो, मेरा खुदा बडा है आती है आंधीया तो कर उसका खैर मकदम तुंफा से ही लडने ,खुदा ने तुझे घडा है…या पद्धतीने समर्थनगर अक्कलकोट परिसरातील महिरूनीसा व नूरजहाँ इनामदार या दोन मुस्लिम भगिनींनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आलेल्या प्रत्येक संकटावर व अडचणीवर समर्थपणे मात करून स्वावलंबनाचे धडे दिले आहे.
काही अपरिहार्य कारणास्तव अविवाहित राहिल्यामुळे आपले गरीब बंधू अब्दुलरजाक यांचेकडे ते रहात आहेत.दोन्ही भगिनी सतत काही ना काही उद्योग करून आपले व आपल्या भावाचा उदरनिर्वाह करत असतात. यामध्ये एक भगिनी घरी बसून बांगड्या,सौंदर्यप्रसाधने,आयुर्वेदिक प्रोडक्टची विक्री करतात व दुसरी भगिनी साड्यांना फॉलपिको करणे,ब्लाऊज शिवणे इत्यादी कामे करतात.पण कोव्हिडं -१९ च्या महामारीत सर्व व्यवसाय धंदे बंद झाले होते त्यात यांचाही व्यवसाय ठप्प झाला. बंधुराजांचे पान दुकान ही बंद झाले. हातावरचे पोट असल्यामुळे सगळीकडूनच आकाश फाटले होते. हातावरचे पोट असल्यामुळे उत्पन्नाची सर्व साधने बंद झालेली होती घरात सहा सात मंडळी आता कसे चालणार ?काय होणार ? असा विचार सतत मनात येत होता.
घरात अन्नधान्यही थोडे दिवस पुरेल एवढे होते पण या परिसरात भाजी मिळत नव्हती भाजीसाठी खूप वणवण करावी लागत असे यावर विचार करून ह्या भगिनींनी ठरविले की आपण भाजीचा व्यवसाय करूयात व या परिसरातील लोकांची सोय होऊन त्यांना मदतही होईल व दोन पैसे आपणासही मिळतील.मनाचा निश्चय केला व लागले कामाला. बंधुराजांची जुनी सायकल काढली थोड्याशा डागडुजी नंतर व्यवस्थित करून प्रथम दिवशी लिलावात जाऊन भाजी खरेदी केली व ती स्वच्छ करून नीटनेटकी करून पिशव्या भरल्या प्रथम दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला समर्थनगर,विश्वनगर,रामनगर, बॅगेहल्ली रोड इत्यादी परिसरात फिरून चांगली विक्री झाली. दुसऱ्या दिवसापासून खरेदी वाढवली सायकलवर दुपारपर्यंत परिसरात भाजी विकून शिल्लक राहिली तर जेऊर रोडवरील जोजन कट्ट्यावर बसून विक्री चालू केली.
स्वच्छ व ताजी भाजी परिसरातील लोकांना रोज मिळू लागली आमच्या प्रामाणिकपणामुळे परिसरातील लोकांमध्ये अल्पावधीतच आम्ही प्रसिद्ध झालो. लोकांची गैरसोय दूर झाली व आमचीही संसाराची घडी सुरळीत होऊ लागली. लॉकडाऊन संपल्यानंतर हा भाजी व्यवसाय बंद करावा असा विचार करत होतो तर परिसरातील लोकांनी मुद्दाम फोन करून व प्रत्यक्ष भेटून हा भाजी विक्रीचा व्यवसाय चालू ठेवा अशी मागणी व विनंती केली त्यानुसार आजही हा व्यवसाय आम्ही करत आहोत या प्रामाणिक प्रयत्नांमुळे एक आत्मिक समाधान मिळत आहे.
कुठलीही परिस्थिती येवो न डगमगता सारासार विचार करून निडरपणे त्याचा सामना करा व आलेल्या अडचणींना धीरोदात्तपणे तोंड द्या. तरच तुम्ही नक्कीच यातून सुखरूपपणे बाहेर पडाल असा संदेश महिला दिनानिमित्त आमच्या इतर भगिनींना द्यावासा वाटतो,असे त्यांनी सांगितले.