मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंची क्राईम ब्रँचमधून तत्काळ बदली करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली. मात्र, पोलिस निरीक्षक सचिन वाझेंची अटकेवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे ठाम राहिले. विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. निष्पक्षपणे चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे ही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
सचिन वाझ प्रकरणावरून वातावरण अत्यंत संतप्त आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणीस यांनी त्यांच्या पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझे पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. सचिन वाझेंचे निलंबन करून अटक करावी, अश मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. वाझेंच्या बदलीबाबत आम्ही समाधानी नाही. निलंबन होईपर्यंत अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.