सोलापूर,दि.१८ : शहरातील वाढता कोरोनचा प्रादुर्भाव रोखण्याकरता पोलीस प्रशासन आणि महापालिका संयुक्तरित्या कडक निर्बंध व दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.
राज्यमध्ये कोरोना सारख्या महामारी ची दुसरी लाट निर्माण झाल्याने राज्य शासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा प्रशासन प्रमुखास देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने गुरुवारी पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त धनराज पांडे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर व पालिका अधिकारी, आरटीओ अधिकारी, राज्य उत्पादन अधिकारी, अन्न व औषध प्रशासन,महानगरपालिकेचे सर्व झोन अधिकारी, आर.टी.ओ चे अधिकारी,सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, एसटी विभागाचे अधिकारी, मार्केट यार्डचे अधिकारी, एक्सइज विभाग, सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक तसेच सर्व पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदीसह पालिकेच्या प्रमुख विभागातील अधिकाऱ्यांचा संयुक्त बैठक घेऊन पुढील काही दिवसांमध्ये सोलापूर शहरांमध्ये वाढत चाललेला कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्याकरता योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी पालिका आयुक्तांनी दिले. टेस्टिंगवर अधिक भर दिला जाणार असून पुढील काळामध्ये कंटेनमेंट झोन देखील निर्मिती करण्यात येणार असून पन्नास मीटरच्या कंटेनमेंट झोन ची मर्यादा ठरविण्यात आली आहे.
शिवाय सार्वजनिक ठिकाणी भरणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या वर देखील वेळेची मर्यादा घालून सकाळी सात ते अकरा पर्यंत सार्वजनिक ठिकाणी भाजी विक्री परवानगी देण्यात येणार आहे.याशिवाय यापूर्वी आखून दिलेल्या मोकळ्या जागेत भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. कंटेनमेंट निर्मिती करण्याकरिता आवश्यक असणारी सर्व उपाययोजना करीत असताना पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. पुढील काळामध्ये सोलापूर शहराचा कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी यापुढे देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल,असेही ते म्हणाले.