ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्याकडून पंढरपूर विधानसभा निवडणूक कामकाजाची पाहणी

 

पंढरपूर, दि. १८ : 252 पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीच्या कामकाजाची पाहणी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व उपसचिव तथा सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी यांनी आज पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, स्वप्निल मरोड, जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोलीस निरिक्षक किरण अवचर, अरुण पवार आदी उपस्थित होते.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीबाबतची माहिती श्री. देशपांडे यांनी घेतली. निवडणूक नियंत्रण कक्षास भेट देवून तेथील एक खिडकी कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष, निवडणूक नियंत्रण कक्ष, मतदार सहाय्यता कक्ष आदी कक्षाची पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचनांचे पालन करुन कामकाज करण्याबाबतच्या सूचना श्री.देशपांडे यांनी केल्या.

शासकीय गोडाऊन येथील स्ट्रॉग रुम, निवडणूक साहित्य ठेवण्यात येणाऱ्या जागेची पाहणीही त्यांनी यावेळी केली. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. यासाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
,

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!