ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रासह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुण्यात होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई, दि. २४ : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूर या विद्यापीठाचे उपकेंद्र बालेवाडी-पुणे येथे तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुणे येथे तर उपकेंद्र बारामती येथे सुरु करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक-नागपूर व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक’चे उपकेंद्र, विभागीय केंद्र स्थापन करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अपर मुख्य सचिव (नियोजन) देबाशिष चक्रवर्ती, अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (व्हीसीद्वारे), कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु ई. वायुनंदन आदींसह संबंधित विद्यापीठांचे मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूरचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात या विश्वविद्यालयाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपकेंद्रात संस्कृत भाषेसह, इंडोलॉजी, संस्कृत भाषांतर आधुनिक शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. या उपकेंद्रासाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विश्वविद्यालयाच्या कुलगुरुंनी या उपकेंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती तातडीने देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र बालेवाडी-पुणे येथे करण्यात येणार आहे. या विभागीय केंद्राचा उपयोग एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. बारामती येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपकेंद्रासाठी शासनाची जागा तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. बारामती येथील उपकेंद्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच अद्ययावत ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या ग्रंथालयाचा लाभ ही विद्यार्थ्यांना होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!