मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२७ : देशभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाला अक्कलकोट तालुक्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.आता तापर्यंत तालुक्यात ७ हजार १८० जणांनी ही लस घेतल्याची माहिती ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दिली आहे.१६ जानेवारीला या कोरोना लसीकरणाला तालुक्यात सुरुवात झाली होती.
तेव्हापासून आजतागायत शहरामध्ये २ हजार १९ तर ग्रामीणमध्ये ५ हजार १६१ जणांनी कोरोना लस घेतली आहे.सध्या ४५ वर्षापुढील कोमारबीड रुग्णांना तसेच ६० वर्षावरील सर्व नागरिकांना ही लस मोफत दिली जात आहे.
सध्या शहरांमध्ये अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे केंद्र आहे तर ग्रामीण भागात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे लसीकरण सुरू आहे.ग्रामीणमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे हे नियोजन करत आहेत. हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्वसामान्य नागरिकांना ही लस उपलब्ध होणार आहे.
ही लस घ्यायची झाल्यास आधार कार्डद्वारे आधी आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आहे त्यानंतर ही लस मिळणार आहे,अशी माहिती त्यांनी दिली.पूर्वी पहिला डोस झाल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस घेतला जायचा आता मात्र यात बदल केला असून तो ४२ दिवसानंतर दिला जाणार आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन डॉ. अशोक राठोड यांनी केले आहे. ४५ वर्षापुढील कोमारबीड रुग्णांना सध्या ही लस दिली जात आहे.
यात शनिवारी ८० वर्षीय शकुंतला साळुंखे या आजीबाईंना देखील ही लस दिली गेली.इतके वय असूनही त्यांना लस घेण्याची खूप इच्छा होती.लसीनंतर त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही त्यावेळी त्यांनीही सर्वांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले.
लस आल्यापासून वयस्कर रुग्णांना
तसेच डॉक्टरांना मदत म्हणून माजी नगरसेवक रामचंद्र समाणे हे सेवा भावी वृत्तीने सामाजिक कार्य करत आहेत.
या लसीमुळे निश्चितच करून कोरोनापासून आपला बचाव होऊ शकतो, असे समाणे यांनी सांगितले.यावेळी वीरेंद्र पाटील,आर.एस भासगी,श्रीशैल बिराजदार, संतोष पुजारी,नीलकंठ पाटील,रामचंद्र समाणे,शंकर कुंभार,सरोजनी पाटील,श्रीमती गोटाळे, माळी, गवंडी यांच्यासह इतर रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★ कोव्हीशिल्ड लस सुरक्षितच
लसीबद्दल विनाकारण अफवा येत आहेत प्रत्यक्षात तसे काही नाही.तालुक्यात सात हजारपेक्षा जास्त लोकांनी ही लस घेतली आहे.कुणालाही त्रास नाही.त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही ही लस एकदम सुरक्षित आहे आणि सर्व नियमानुसार दिली जात आहे.
डॉ.अशोक राठोड,वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट