अक्कलकोट दि.२८: येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वर्षातील सर्वच पौर्णिमांना भाविकांची प्रचंड गर्दी असते, परंतु गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील पौर्णिमे पासून यंदाच्या होळी पौर्णिमेपर्यंत वर्षभरातील सर्वच पौर्णिमा कोरोनाच्या सावटाखाली आले आहेत. सद्यस्थितीत राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने त्याचा परिणाम येथील वटवृक्ष मंदीरातील भाविकांच्या गर्दीवर झाला आहे. परिणामी हुताशनी (होळी) पौर्णिमेदिवशी वटवृक्ष मंदिरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा आलेख कमालीचा खाली आलेला दिसून आला. त्याचे उदाहरण म्हणजे आज होळी पौर्णिमेला दिवसभरात मोजकेच अत्यल्प स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले. आज होळी पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती व सकाळी ११:३० वाजता श्रींची नैवेद्य आरती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहन पुजारी यांच्या हस्ते संपन्न झाली. नैवेद्य आरती नंतर स्वामी भक्तांना ठराविक अंतराने टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. याप्रसंगी तुरळक अत्यल्प स्वामी भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.
दिनांक २६ मार्च २०२१ पासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच मंदिरात भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात यावे असे प्रशासनाचे आदेश असल्याने सद्या तरी दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच भाविकांना मंदीरात प्रवेश देण्यात येत आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार सायंकाळी सात वाजता मंदिराचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात येत आहेत. या यानंतर रात्री ७:४५ ते ८:४५ या वेळेत श्रींची शेज आरती असते. या प्रसंगी कोणत्याही भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच मंदिराचे प्रवेश द्वार उघडण्यात येत आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाच्या आदेशानुसार मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक करण्यात येत आहे. तशा प्रकारच्या सूचना नित्यपणे भाविकांना देण्यात येत आहेत.
होळी पौर्णिमेला पहाटे ५ च्या काकड आरतीस स्वामी भक्तांना मुकावे लागले. प्रशासनाच्या आदेशानुसार सकाळी ७ वाजता मंदिर प्रवेशद्वार उघडल्यानंतर भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात आले. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता गेल्या महिन्याभरापासून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात स्वामी दर्शनाकरिता अत्यंत कमी प्रमाणात भाविक दर्शनास येत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे नेहमी भाविकांनी गजबजणाऱ्या वटवृक्ष मंदिरात निरव शांतता पसरली आहे. या पार्श्वभुमीवर होळी पौर्णिमेलाही स्वामी भक्तांची श्रींच्या दर्शनास अत्यल्प उपस्थिती लाभली.