अक्कलकोट ,दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपक्रम लोकोपयोगी ठरला आहे.याद्वारे विद्यार्थ्याच्या चोरीला गेलेल्या मोबाईलचा फुटेजद्वारे शोध लागला आहे.त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
बोरगाव येथे दि.९ एप्रिल रोजी एका महाविद्यालयीन युवकाचा मोबाईल ग्रामपंचायत कार्यालय परिसरात चोरीला गेल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे आली असता फुटेज द्वारे चेक केले असता मोबाईल चा शोध लागला. बोरगाव येथील बबलू पठाण हा महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईल द्वारे शिक्षण विषयक अभ्यासक्रमातील व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील अंगणवाडी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर झोपी गेला असता पहाटे साडेतीन वाजता उशाला ठेवलेला मोबाईल चोरीला गेल्याचे फुटेज द्वारे दिसून आले. या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला सी. सी. टी. व्ही. फुटेज द्वारे शोधलेला मोबाईल सरपंच विलासराव सुरवसे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. चोरीला गेलेला मोबाईल सापडल्याने ग्रामस्थामधून समाधान व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उपयुक्तता लक्षात घेऊन सरपंच विलासराव सुरवसे आणि संपूर्ण ग्रामपंचायत टीमने ही यंत्रणा कार्यान्वित केल्याबद्दल पठाण परिवाराकडून सरपंच ग्रामपंचायत टीम व या यंत्रणेचे तांत्रिक तज्ज्ञ मायक्रोस्टार कॉम्पुटर चे इब्राहिम कारंजे यांनी तत्परतेने फुटेज काढून सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपसरपंच राजेभाई मुजावर, ग्रामसेवक लक्ष्मण भैरामडगी, विजयकुमार खोबरे, संतोष सुरवसे , प्रा. मनोज जगताप, प्रा. प्रकाश सुरवसे, महादेव पवार, सुनील सुरवसे, मकबूल पठाण, ग्रामपंचायत सदस्य वर्ग, अपंग क्रांती संघटना नेते वाहिद पठाण ग्रामपंचायत कर्मचारी सचिन जिरगे, भागेश जिरगे, विठ्ठल कोळी, गुंडू बागवान उपस्थित होते.