ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर परिसरात आढळला प्रथमच कृष्णपाठी सुतार पक्षी

सोलापूर दि.१३: जिल्ह्यात एकेकाळी विपुल प्रमाणात आढळणारे, पण आता कमी प्रमाणात नजरेस पडणाऱ्या मराठा सुतार पक्ष्यांबरोबर, कृष्णपाठी सुतार हा दुर्मिळ पक्षी येथील ऋतुराज कुंभार, सचिन पाटील, रत्नाकर हिरेमठ व संतोष धाकपाडे या युवा पक्षी छायाचित्रकारांना त्यांच्या भटकंतीच्या वेळी प्रथमच आढळून आला.

पर्यावरण छायाचित्रकार व वाईल्ड लाईफ काॅन्सर्वेशन असोसिएशनचे सदस्य शिवानंद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे तरूण छायाचित्रकार सोलापूर परिसरात भ्रमंतीत सक्रिय असताना या पक्ष्याची नोंद झाली आहे. दरवर्षी सोलापूर परिसरात आढणारे नवीन पक्षी व त्यांच्या अधिवासांच्या सवयींचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून पक्षी वैभवाविषयी योगदान करतात.

कृष्णपाठी सुतार पक्ष्याबद्दल मिळालेली माहिती अशी की – या दिमाखदार पक्ष्याचा वावर नेहमी पश्चिम घाटाजवळच्या सीमेवरील सातारा, सांगली व कोल्हापूर भागात असतो. याचा वावर शक्यतो सोलापूर उस्मानाबाद सारख्या शुष्क प्रदेशात नसतो. जिल्ह्यात सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या मराठा सुतार पक्ष्यापेक्षा मोठ्या आकाराचा हा पक्षी असून त्याची पाठ काळी असते. पाठीवर त्रिकोण आकाराचा पांढरा पट्टा असतो तो पट्टा मानेपर्यंत विस्तारलेला असतो. या गुणधर्मामुळे इंग्रजीत या पक्ष्याला व्हाईट नेपड वुडपेकर (White naped woodpecker) असे नाव पडले आहे.पंख सोनेरी रंगाचे असतात व पाठ काळसर असते. या कारणावरून या पक्ष्याला कृष्णपाठी सुतार असे म्हणतात. डोळे लाल असतात. नर पक्ष्याच्या डोक्यावर लाल रंगाचा तुरा असतो तर मादीला पिवळ्या रंगाचा तुरा असतो. या पक्ष्यांचा आवाज खंड्या पक्ष्यासारखा असून तो किंचित कर्कश वाटतो. या पक्ष्यांची चोच टोकदार छन्निसारखी असून त्याचा उपयोग मोठ्या झाडांच्या बुंध्यावर व फांद्यांवर छिद्र पाडून घरटी तयार करण्यासाठी तसेच बुध्यावरील साल उचकटून त्याखाली आश्रयाला असलेल्या कीटक टिपण्यासाठीसाठी होतो. या पक्ष्यांची जीभ लांबलाचक असते. जीभेने हे पक्षी झाडांच्या सालीखाली लपलेल्या कीटकांना लीलया व सफाईदारपणे मटकवतात.

दक्षिण पश्चिम व मध्य भारतात या पक्ष्यांचा वावर असतो. हा पक्षी जगात कुठेच सापडत नाही. या कारणावरून या पक्ष्याचा ‘एंडेमिक’ गटात समावेश केला गेला आहे. सोलापूर सारख्या दाट जंगले नसलेल्या प्रदेशात या पक्ष्याने आपले दुर्मिळ अस्तित्व गेल्या नोव्हेंबरमध्ये दाखवून दिले आहे हे विशेष आहे.

“कृष्णपाठी सुतार पक्षी सोलापूर जिल्ह्यात दुर्मिळ असून सध्या शहर भवतालच्या जंगल व वनराई परिसरात गेल्या नोव्हेंबरपासून वावरताना दिसतो आहे. त्याच्या वावरामुळे जिल्ह्यातील पक्षीप्रेमी सुखावले आहेत आणि सोलापुराच्या पक्षीवैभव समृद्ध झाले आहे.” -डाॅ. अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!