अक्कलकोट, दि.१७ : कोरोना संसर्गाचा विळखा वाढत चालला असतानाच अक्कलकोट शहरात शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला
आहे.याकडे जिल्हाधिकार्यांनी लक्ष द्यावे,
अशी मागणी केली जात आहे.
अक्कलकोट तालुक्याची लोकसंख्या तीन लाखापेक्षा अधिक आहे. एक मुख्य ग्रामीण रुग्णालय, आठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोळा आरोग्य उपकेंद्र आहेत.या अंतर्गत लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. परंतु या सर्व ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात साधारण १३ ते १४ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे.अद्याप हजारो नागरिक लस मिळणे बाकी आहे.
लसीसाठी नागरिक ग्रामीण रुग्णालय तसेच आरोग्य केंद्राला हेलपाटे मारत आहेत.परंतु रोज शंभर जणांना ही लस दिली जात असल्याने अन्य लोक या पासून वंचित राहत आहेत. सध्या ४५ वर्षावरील सर्वसामान्य नागरिकांना ही लस मिळत आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात नागरिकांचा प्रतिसाद देखील आहे.
परंतु लसीचा तुटवडा असल्याने या कामात व्यत्यय निर्माण होत आहे. चार दिवसापूर्वी अक्कलकोट शहरात चार लसीकरण केंद्र उघडण्यात आली होती. अशाच प्रकारे शहर आणि ग्रामीण भागात विशेष मोहीम राबवून सर्वांना लस उपलब्ध करून द्यावे, अशा प्रकारची मागणी जनतेतून होत आहे. याबाबत आरोग्य विभागाला विचारले असता लस संपली आहे.
येत्या दोन दिवसात ती उपलब्ध होईल, सोमवारपासून पुन्हा सुरळीत लसीकरणाला सुरुवात होईल,असे सांगण्यात आले.