सोलापूर, दि.१० : यंदा कोजागिरी पौर्णिमेला तुळजापूरला पायी जाता येणार नाही,असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता यंदाचा नवरात्र महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा,असे निर्देश राज्य सरकारचे आहेत. त्यामुळे यावर्षी पायी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे नवरात्र उत्सव देवीचे आगमन आणि विसर्जन याची कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही. उत्सव काळात सार्वजनिक मंडळांना सार्वजनिक ठिकाणी मंडप घालून शक्ती देवीची प्रतिष्ठापना करता येणार नाही, पहाटेच्यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रुपाभवानी मंदिर अथवा अन्य देवीच्या मंदिराकडे चालत जाऊ नये सीमोल्लंघनाचा कार्यक्रम करून नये,अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याशिवाय रावण दहन अशा कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आली आहे. नवरात्रोत्सव काळात डॉल्बी, झांज पथक, सार्वजनिक ठिकाणी बॅनर आणि पोस्टर लावण्यासही मनाई करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेशच पोलिस खात्याने काढला आहे.