मारुती बावडे
अक्कलकोट : एकीकडे
कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे
अक्कलकोटमधील ट्रामा
केअर सेंटरचे काम गेल्या चार
वर्षापासून रखडले आहे.त्यामुळे
अक्कलकोट तालुक्यात संतापाची
लाट उसळली आहे.हे सेंटर जर
चालू झाले असते तर या कोरोना
संकटाच्या काळात या यंत्रणेची
खूप मोठी मदत झाली असती
आणि अनेकांचे जीव वाचले
असते,अशी प्रतिक्रिया
नागरिकात व्यक्त होत आहे.
याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे.अक्कलकोट ते सोलापूर हा मोठा रस्ता आहे तसेच हा तालुका कर्नाटक सीमेलगतचा आहे. तालुक्याची लोकसंख्या देखील फार मोठी आहे त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा सगळा भार ग्रामीण रुग्णालयावरती पडतो. त्यामुळे २०१६ साली अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे २ कोटी ३५ हजार रुपयाच्या ट्रामा केअर सेंटरला शासनाने मंजुरी दिली. त्याच्या मंजुरीसाठी तत्कालीन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी मोठा पाठपुरावा केला होता.
या ट्रामा केअरमध्ये आयसीयुसह,
५० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल त्यामध्ये किमान तीस ऑक्सिजन बेड आहेत त्याशिवाय व्हेंटिलेटर,एक्स-रे मशीन, ऑपरेशन थिएटर,एम.डी, एम.एस,बी. ए.एम.एस अशा दर्जाच्या डॉक्टरचा देखील यात समावेश आहे. किमान ५० जणांचा स्टाफ या हॉस्पिटलमध्ये असणार आहे.
परंतु हे आत्ताच्या घडीला सगळे शून्य आहे. त्याचे कारण म्हणजे प्रशासनाचा हलगर्जीपणा असून २०१६ साली मंजूर झालेले हे ट्रामा केअर १८ महिन्यात पूर्ण होणे गरजेचे होते.परंतु ते पूर्ण केले नाही किंवा ते करून घेतले नाही.त्यात कहर म्हणजे अजूनही हे काम रखडले आहे.त्यामुळे हलगर्जीपणाचा कळस दिसून येत आहे.
वास्तविक पाहता अक्कलकोटमध्ये आज एकही मोठे खासगी हॉस्पिटल नाही त्याठिकाणी ऑक्सिजनची सोय नाही अशा परिस्थितीत नवीन कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू करून त्या ठिकाणी सर्व सुविधा स्वखर्चाने उभ्या कराव्या लागत आहेत.परंतु शासनाच्या ट्रामा केअर सेंटरला मंजुरी असताना ते फक्त वेळेत न केल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे.ग्रामीण रुग्णालय सध्या अस्तित्वात असले तरी त्याचा फारसा उपयोग कोव्हिड रुग्णासाठी होत नाही परंतु जर ट्रामा केअर सेंटर राहिले असते तर मात्र याचा नक्कीच उपयोग झाला असता पण आज चार वर्षापासून इमारतीचे काम रखडल्याने मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत लोकमंगल डेव्हलपर्सला २०१९
साली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी नोटीस देखील बजावलेली आहे तरीही ठेकेदाराने हे काम पूर्ण केले नाही. एकीकडे गरज पडली की लाखो
रुपये शासन खर्च करते परंतु त्याच ठिकाणी आरोग्या सारख्या गंभीर विषयाचे काम
चार वर्षांपासून रखडले आहे. ते काम का रखडले, त्याचे काम का होत नाही, निधी मंजूर असताना काम पूर्ण होऊन त्याचा उपयोग जनतेला का होत नाही,असा
सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने या बाबीकडे लक्ष देऊन हे ट्रामा केअर सेंटर एक महिन्याच्या आत अक्कलकोटकरांच्या सेवेत दाखल
करावे,अशी मागणी पुढे येत आहे.
★ ट्रामाचे ८० टक्के काम पूर्ण
ट्रामा केअर सेंटरचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे केवळ २० टक्के काम बाकी आहे जर हे २० टक्के काम पूर्ण झाले तर सिव्हिल हॉस्पिटल सारखी जम्बो इमारत अक्कलकोटकरांच्या सेवेत दाखल होऊ शकते पण अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदाराच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे हे काम गेल्या
चार वर्षापासून रखडले आहे.
★ … तर अनेकांचा जीव वाचला असता !
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे कालच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना ही बाब निदर्शनास आणून दिली.ते याबाबतीत सकारात्मक आहेत मात्र प्रशासनाने इतका वेळ काढू
पणा याबाबतीत का केला,असा प्रश्न
कायम आहे जर हे काम वेळेत पूर्ण झाले
असते तर कोरोनामध्ये इतक्या लोकांचा बळी गेला नसता हे नक्की – अशपाक बळोरगी,पक्षनेते अक्कलकोट न.प