अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कलरहिप्परगे शिवारात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्याने धुमाकूळ माजवला असून दुसर्या दिवशीही त्याचा शोध होऊ शकला नाही. आज दिवसभर वनविभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे जीवित हानी होऊ नये, याची काळजी प्रशासन घेत आहे. त्यादृष्टीने कलहिप्परगे, शावळ, शावळ तांडा, घुंगरेगाव, नागणसूर, नाविदगी, हंद्राळ, गौडगाव, करजगी, मंगरूळ भागात गस्त घालण्यात येत आहे.
सकाळपासून शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, पोलिस पाटील संतोष गुजा व गावापातळीवरील शिवसेना कार्यकर्ते व वन अधिकारी बी.एन.डोंगरे, शंकर कुताटे व विभुते व अन्य कर्मचारी तैनात आहेत.या पार्श्वभूमीवर आज वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार सोलापूर यांनी पहाणी केली. शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या कडुन जयश्री पवार यांनी भौगोलिक स्थितीची सविस्तर माहिती जाणून घेऊन लवकरच जेरबंद करण्याचे आश्वासन दिले. या रान गव्याची प्रतीतास ६० किलोमीटर पळण्याची क्षमता असल्याचे व ८० ते ९० लोकांना चिरडण्याची ताकद या प्राण्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.याला लवकर जेरबंद करा नाही तर तालुक्यातील लोकांच्या जीवाला यापासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे बुक्कानुरे यांनी सांगितले.याबाबतची कल्पना तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे.
तहसीलदार मरोड यांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटीलाना सावध राहण्याची सुचना दिली आहे. १८३५ नंतर सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्राणी मिळाल्याची माहिती जयश्री पवार यांनी ग्रामस्थांना दिली. गेल्या दोन दिवसापासून वनविभागाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी तसेच दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत त्याचा शोध अद्यापही सुरू आहे दुसऱ्या दिवशीच्या शोधकार्य संपले आहे असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.