सोलापूर, दि.३ : सोलापूर शहरातील लाॅकडाऊन काळातील निर्बंधात शिथीलता देण्या संबधीचा आदेश दुपार पर्यत प्राप्त होईल, अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्या करिता शासनाकडून मागील महिन्यात मिनी लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली. दीड महिन्याच्या लाॅकडॉन काळामध्ये सर्वसामान्य व्यावसायिक व्यापारी दुकानदार मोलमजूरी विडी कामगार आदी समोर मोठे आर्थिक संकट उभारले होते.
करोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचे लक्षात येताच काही शहरांमध्ये लाॅकडॉन उठवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता, ज्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या कमी आहे आशा शहरांचा निर्णय स्थानिक पातळीवर अधिकाऱ्याने घ्यावा असा देखील निर्देश शासनाकडून प्राप्त झालेला होते. पण शासनाने घालून दिलेल्या नियमावलीत सोलापूर शहराचा समावेश होत नसल्याने पालिका प्रशासन आणि सर्वसामान्य सोलापूरकरांची मोठी निराशा झाली होती.
विविध पक्षाचे राजकीय पुढारी, स्थानिक व्यापारी, उद्योजक, कामगार, विविध सामाजिक संघटना यांनी शहरातील लाॅकडॉन उठवावे अशी एकमुखी मागणी केली होती. शासनाच्या निकषात सोलपुरचा समावेश होत नसल्याने पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सोलापूर शहरात शिथिलता द्यावी अशा मागणीचा विशेष प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शिवाय महापौर श्रीकांचन यन्नम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून सोलापूर शहरास शिथीलता देण्यासंबंधीचा आदेश द्यावा अशी मागणी लावून धरली होती. महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या प्रयत्नाने शहरातील निर्बंधात शिथिलता देण्यासंबंधीचा आदेश प्राप्त होणार असल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.