ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रॅपिड टेस्टिंगवर भर देत हंजगीकरांनी केली कोरोनावर मात ; ग्रामस्थांच्या एकजुटीला प्रशासनाची साथ

अक्कलकोट :  हंजगी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि प्रशासनाने टेस्टिंगवर भर दिल्यामुळे गावची वाटचाल कोरोना मुक्त गावाच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीही आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. पूर्वी या गावात टेस्टिंगला प्रचंड विरोध होता. त्यात एप्रिल महिन्यात एकाच आठवड्यात गावात पंधरा मृत्यू झाल्याने अख्खे गाव हादरुन गेले होते. गावातील ग्रामस्थ देखील भयभीत झाले होते.

आयुष्यात पहिल्यांदाच गावात इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने गावपातळीवर भीतीचे वातावरण पसरले होते. गावकरी गाव सोडून वाडीवस्त्यावर जाताना दिसून येत होते. तेव्हा तहसीलदार अंजली मरोड यांनी गावपातळीवर येऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत धीर देत टेस्टिंगवर भर देण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले होते. तेव्हा गावपातळीवरील गाव समिती सचिव आणि सदस्य व ग्रामस्थ मिळून तहसीलदार मरोड यांना विनंती करून गावपातळीवर रॅपिड टेस्टिंग घेण्याची विनंती केली होती.

यावेळी तहसीलदार अंजली मरोड व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी गावपातळीवर वैदयकीय पथक पाठवून ग्रामस्थांची सलग तीन वेळा गावात रॅपिड अॅन्टीजन टेस्ट घेऊन ग्रामस्थांची भीती दूर केली. आज पर्यंत टेस्टींगमध्ये जवळपास पंधरा पाॅजिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन मयत व तेरा पाॅजिटिव्ह रुग्ण अक्कलकोट कोविड सेंटर मधून ठणठणीत बरे होऊन सध्या घरी आल्याने आता हंजगी गावाची अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या शून्यावर येऊन पोहचली आहे.

सध्या ग्रामस्थांची भीती दूर होऊन टेस्टिंगसाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभताना दिसून येत आहे.एकीकडे पाॅजिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे गावपातळीवर टेस्टिंगवर भर देत गाव कोरोनामुक्त करण्यात गाव समितीचेही मोठे योगदान आहे. गावात प्रशासक असूनही गाव कोरोना समिती सचिव भिमराव गुरव व गाव कोरोना समिती अध्यक्ष बसवराज पाटील, गाव समिती सदस्य, आशा वर्कर,  अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांच्या अथक परिश्रमाने हंजगी गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे ग्राम सचिव भिमराव गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  • मानसिकता बदलण्याची गरज

अक्कलकोट तालुक्यात आजही अनेक गावांमध्ये टेस्टिंगला प्रचंड विरोध आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे पण
हंजगीकरांनी ज्या पद्धतीने मानसिक बदलून प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला त्यामुळे तेथील रुग्णसंख्या घटली.
याचा आदर्श इतर गावांनी घेण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!