अक्कलकोट, दि.७ : जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी आदेश दिल्यानंतर अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सोमवारी निर्बंधामध्ये शिथिलता करण्यात आली.यानंतर सकाळपासूनच सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली.यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने कोरोनाची खबरदारी घेतच सर्व व्यवहार सुरळीत पार पडावेत,असे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे.
दरम्यान एसटी सेवा देखील उद्यापासून ग्रामीण भागामध्ये सुरू होत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा समावेश तिसऱ्या स्तरांमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार दुपारी चार वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी पूजाअर्चा करून तब्बल दीड ते दोन महिन्यानंतर व्यवहारास सुरुवात केली आहे.काही बसेस सुरू झाल्या आहेत.
काही सुरू होणार आहेत.सोमवार हा दिवस नेहमी बाजाराचा असतो परंतु कोरोनामुळे आठवडा बाजार सध्या बंद आहे.तरी अनलॉकनंतर आज पहिला दिवस असल्याने ग्रामीण भागातील लोकांनी बाजारासाठी मोठी गर्दी केली होती.
पोलीस प्रशासनानेही विना मास्क वाल्यांची ठिक – ठिकाणी चौकात नागरिकांची चौकशी आणि विचारपूस करत होते. शहरातील हॉटेल रेस्टॉरंट मात्र दुपारी चार वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेने कार्यरत होती.याची प्रभावी अंमलबजावणी मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्यासह पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे. चार नंतर मात्र कडक निर्बंध लागू असतील. नियम मोडल्यास शासन निर्णयानुसार कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी पाटील यांनी दिला आहे.
★ प्रवाशांनी लाभ घ्यावा
ग्रामीण भागात उद्यापासून बस सेवा सुरळीत होणार आहे तशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार सकाळपासून सर्व फेऱ्या सुरू होतील.पूर्ण क्षमतेने ही सेवा सुरू राहील.प्रवाशांनी सेवेचा लाभ घ्यावा.
रमेश म्हंता,आगार प्रमुख अक्कलकोट