ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्राच्या हितासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली थेट मुख्यमंत्री येडियुरप्पांची भेट ; आलमट्टी धरण पाण्याविषयी दोन्ही राज्यांचा योग्य समन्वयासाठी चर्चा

मुंबई दि. १९:- यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगलूर येथे भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई तसेच कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव, तसेच जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय कुमार गौतम व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान कृष्णा व भीमा नद्यासंदर्भात येणाऱ्या काळात पूराचे नियंत्रण कशापध्दतीने करता येईल आणि त्यात कोणत्या पध्दतीने दोन्ही राज्याने समन्वय ठेवायचा याची चर्चा झाली.

◆ जलहवामान विषयक यंत्रणा

महाराष्ट्राने रिअल टाईम डाटा अक्वीझिशन सिस्टीम (जलहवामान विषयक विनाविलंब माहिती मिळविण्याबाबतची यंत्रणा) बसवली आहे मात्र कर्नाटक सरकारने ही यंत्रणा अजून बसवलेली नाही. कर्नाटकात ही यंत्रणा तयार झाली तर एकत्रित अलमट्टीची डायनाँमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल आणि एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा व महाराष्ट्रात पडणारा पाऊस या सगळ्यावर आपण प्रभावीपणे जर नियंत्रण ठेवले तर कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती पातळी ठेवायची खास करुन अलमट्टीची वर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशीही चर्चा झाल्याचे श्री.
पाटील यांनी स्पष्ट केले. ही बैठक दोन्ही राज्यात योग्य समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

◆ अचूक नियोजन

२०१९चा पूर लक्षात घेता, गतवर्षी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शन अचूक नियोजन झाले होते. यंदाही पश्चिम महाराष्ट्राला पूराचा तडाखा बसू नये यासाठी श्री. पाटील प्रयत्नशील आहेत. आजची भेटही पूर नियंत्रणाच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. असे श्री. पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!