ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुटुंब प्रबोधन-विविध संस्थांतर्फे होणाऱ्या योग सप्ताहाची तयारी पूर्ण,जिल्ह्यातील 25 हजार कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प

 

सोलापूर, दि. 19 : 21 जून या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने कुटुंब प्रबोधन पश्चिम महाराष्ट्र प्रांत सोलापूर जिल्हा आणि समाजातील विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 27 जून या कालावधीत योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या योग सप्ताहात सोलापूर जिल्ह्यातील 25 हजार कुटुंबांनी सहभाग घ्यावा असे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे कुटुंब प्रबोधन संयोजक प्रा. देवानंद चिलवंत यांनी दिली आहे.

या योग सप्ताहाच्या कार्यक्रमात पतंजली योगपीठ, लोकमंगल बॅंक, लोकमंगल पतसंस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर जनता सहकारी बॅंक, सोलापुरातील विविध योग मंडळे, नेहरू युवा केंद्र, शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण प्रशाला, नू.म.वि., विलासभाई मेहता विद्यालय, सोलापूर सोशल फाऊंडेशन, यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील आणि विविध तालुका, शहरातील कार्यकर्ते हे सर्व योग सप्ताहात सहभागी होत आहेत. याशिवाय सोरेगाव येथील राज्य राखीव बल गट येथेही योग सप्ताह साजरा होणार आहे.

या सप्ताहाचे आयोजन उत्तमरितीने व्हावे यासाठी सोलापूर शहर आणि  अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि बार्शी असे पाच तालुके मिळून सोलापूर जिल्हा करण्यात आला आहे.  त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. योगयुक्त, रोगमुक्त आणि स्वस्थचित्त कुटुंब हेच या योग सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश असल्याचे सोलापूर जिल्हा कुटुंब प्रबोधन संयोजक प्रा. देवानंद चिलवंत यांनी सांगितले.

रोज 30 मिनिटे योगसाधना

या योग सप्ताहात कशा प्रकारे योगसाधना व्हावी याचेही नियोजन झाले आहे. एकूण 30 मिनिटांची ही योग साधना राहणार आहे. मध्ये 5 मिनिटे सूक्ष्म आसने, 5 मिनिटे तीन योगासने, 5 मिनिटे प्राणायाम, 3 मिनिटे यमनियम उच्चारण, 12 मिनिटांची श्री श्री श्री  रविशंकर  यांच्या ऑडिओ क्लीपवर ध्यानधारणा होईल. अशारितीने वेळापत्रक आखण्यात आले आहे. पहिले तीन दिवस कुटुंब प्रबोधनतर्फे तयार करण्यात आलेले 30 मिनिटांचे योग असतील. (21 ते 23 जून). 24 जून रोजी यम-नियम याबाबत श्री श्री श्री रविशंकर यांच्या ऑडिओमार्फत माहिती दिली जाणार आहे. तर 25 ते 27 जून असे तीन दिवस आयुष्यमान भारत मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार 40 मिनिटांचे योग व्हीडिओ क्लीपद्वारे करून घेतले जाणार आहेत.

एका गटात 25 कुटुंबे

हा सर्व कार्यक्रम ऑनलाईन होणार असून कुटुंबाने आपल्या घरातच करावयाचा आहे. यासाठी 25 कुटुंबांचा एक गट तयार करण्यात येणार आहे. या कुटुंबाचा एक गटप्रमुख राहणार आहे. हा गट प्रमुख प्रशिक्षित असेल. तसेच त्याच्याकडे प्रांत स्तरावरून आलेल्या योग साधनेचा व्हिडिओ असेल. हा व्हिडिओ त्याने आपल्या गटातील सर्वांना पाठवावयाचा आहे. तसेच या गटाची एक लिंकही तयार केली जाईल आणि या लिंकच्या माध्यमातून हा संपूर्ण गट दिवसातील निश्चित अशी वेळ ठरवून कोणत्याही (सकाळ किंवा संध्याकाळ) वेळी आपली योगसाधना करेल. हा प्रशिक्षित गटप्रमुख आवश्यक त्या सूचना संबंधित कुटुंबांना ऑनलाईनच्या माध्यमातून देत राहील.

1 हजार गट प्रमुख

सोलापूर शहर आणि त्याला जोडलेले अन्य पाच तालुके अशा सर्व ठिकाणाहून विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या माध्यमातून सुमारे 1 हजार गट प्रमुखांना प्रशिक्षण व्हिडिओद्वारे आणि ऑनलाईन दिले जात आहे.  त्यांच्या माध्यमातून 25 हजार कुटुंबे या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच 20 गट प्रमुखांच्यावर एक गटनायक असतील. त्यांच्याकडून गटप्रमुखांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना दिल्या जातील. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण केले जात आहे.

सर्वस्पर्शी कार्यक्रम होण्यासाठी प्रयत्न

हा योगसाधनेचा सप्ताह अधिकाधिक कुटुंबात व्हावा यासाठी समाजातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, विविध समाजाच्या संघटना, सहकारी बॅंका, वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संघटना, सहकारी संस्था  यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. यातून त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या परिघातील कुटुंबे योगयुक्त, रोगमुक्त आणि स्वस्थचित्त होण्यासाठी प्रयत्न केले जातील.  हा कार्यक्रम सर्वदूर आणि सर्वस्पर्शी होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, राज्य राखीव बल गट आणि नेहरू युवा केंद्र यांच्या माध्यमातून सर्वांशी संपर्क साधला जात आहे.

कोणाला सहभागी होता येईल

या सप्ताहात होणाऱ्या योग साधनेमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुटुंबातील सर्वांना सहभागी होता येणार आहे. फक्त वैद्यकीय क्षेत्रातून ज्या व्यक्तींना योगासने करू नये असे सांगितले जाते त्यांनीच यात सहभागी व्हावयाचे नाही. उदा. आजारी व्यक्ती, गरोदर महिला, असे जे काही डॉक्टरांनी त्यांना व्यायाम करावयास मनाई केली आहे अशाच व्यक्ती यापासून अलिप्त राहतील. बाकी सर्वांना या सप्ताहात योग साधना करता येणार आहे. तसेच याला कोणत्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे बंधन नाही. महिला-पुरूष असा कोणताही भेदभाव यात नाही. तसेच यासाठी कसल्याही प्रकारचे शुल्कही आकारले जाणार नाही. यासाठी गरज आहे फक्त ती कुटुंबात ऍनरॉईड मोबाईलची आणि मोबाईल डाटा कनेक्शनची. केवळ संपूर्ण कुटुंबात एकच मोबाईल असला तरीही पुरेसे ठरणार आहे. त्यामुळे समाजातील अधिकाधिक कुटुंबांनी या योगसप्ताहाच्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. देवानंद चिलवंत यांनी केले आहे.

हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यात तयारी सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे कुटुंब प्रबोधन  संयोजक प्रा. देवानंद चिलवंत (मोबाईल क्रमांक 9923404403) व योग सप्ताह प्रमुख ऍड. अमोल देशपांडे (संपर्क क्रमांक) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, पतंजली योगपीठाच्या वरिष्ठ राज्य प्रभारी महाराष्ट राज्य, सुधाताई अळ्ळीमोरे, ऍड. अमोल देशपांडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार, योग सप्ताह प्रचार प्रमुख दत्तात्रय आराध्ये, चन्नवीर बंकूर, प्रा. नरेंद्र काटीकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!