ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात हाहाकार, दीडशे लोकांना हलविले, नदीकाठच्या गावांना धोका कायम, कुरनूरचे सहा दरवाजे उघडले

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे ओढे,नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून कुरनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.यामुळे बोरी नदी ओसंडून वाहत असून नदीकाठच्या सर्व गावांना धोका निर्माण झाला आहे.बोरीउमरगे, पितापूर,हन्नूर, शिरशी या गावात पाणी शिरल्याने या ठिकाणच्या दीडशे लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.त्याशिवाय वागदरी -अक्कलकोट, अक्कलकोट – नागणसूर, शिरशी असे सर्व रस्ते पाण्यामुळे बंद झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पाण्याचा
विसर्ग वरून कायम असल्याने नदीकाठच्या गावांना धोका कायम आहे.शेती पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जनतेने खबरदारी घ्यावी,अशा सूचना आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह प्रशासनाकडून तहसीलदार अंजली मरोड यांनी नागरिकांना दिल्या आहेत.

दरम्यान पावसाची शक्यता कायम असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्यात मंगळवारी रात्रभर पाऊस होता तसेच बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अक्कलकोट शहरातील हत्ती तलाव ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे त्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले.नदीकाठचे बोरी उमरगे गाव पाण्याखाली गेले.नदीकाठी जितका परिसर शेतीचा येतो तो परिसर पूर्णपणे सध्या पाण्याखाली गेलेला आहे. संगोगी गावात देखील रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरने गटार न बांधल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.हन्नूर,पितापूर, शिरशी सांगवी या गावांनी मोठ्या प्रमाणात पाण्याचा शिरकाव झालेला आहे. अक्कलकोट शहरामध्ये प्रभाग क्रमांक पाच मधील लोकांना हत्ती तलावाचा धोका निर्माण झालेला आहे. सकाळी या ठिकाणी नगरसेवक महेश हिंडोळे, उत्तम गायकवाड, सुनील बंडगर, अविनाश मडीखांबे, आमदार कल्याणशेट्टी यांनी पाहणी केली.मैंदर्गी, नागणसूर, बोरी उमरगे, सांगवी, शिरशी, वागदरी निमगाव यासह तालुक्यातील अनेक भागातील रस्ते हे अति पावसामुळे पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक ठिकाणी बस सेवा बंद आहे. अनेक गावात वीज पुरवठा बंद आहे.
विद्युत खांब कोसळलेले आहेत. अनेक गावांमध्ये मोबाइल नेटवर्क गायब झालेले आहे. कुरनूर धरण तर मागच्या आठवड्यापासून ओव्हर फ्लो झालेले आहे पण आज अति ओव्हर फ्लो झालेले आहे. दरवाजाच्या वरच्या बाजूने पाणी वाहत आहे.अजूनही नळदुर्गचा नर- मादी धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने पाण्याचा वेग कायम आहे त्यामुळे पुन्हा धरणाच्या पाण्यात वाढ होऊ शकते,असा अंदाज तहसीलदार अंजली मरोड यांनी व्यक्त केला आहे.या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी,तहसीलदार अंजली मरोड यांनी बोरोटी तलावाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. हा तलाव फुटण्याची शक्यता गृहीत धरून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आणि तेथील लोकांनाही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. आमदार कल्याणशेट्टी यांनी आज कुरनूर धरण, बोरोटी, शिरशी, अक्कलकोट शहरातील अनेक ठिकाणी भेटी देऊन नागरिकांना आधार दिला आहे.त्याठिकाणी ग्रामसेवक, तलाठी यांना परिस्थितीवर लक्ष ठेवा,जीवित हानी होऊ देऊ नका, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पिकांचे पंचनामे नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

आणखी दोन-तीन दिवसात पावसाची शक्यता असल्याने तालुक्यातील सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन तहसीलदार अंजली मरोड यांनी केले आहे.या पार्श्वभूमीवर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी वागदरीचे जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

कुणीही स्टंटबाजी
करू नये –

कुरनूर धरण ओव्हर फ्लो झाल्याने अनेक लोक फोटो व सेल्फी काढण्यासाठी धरणावरती येत आहेत.त्यामुळे त्या ठिकाणी आता बंदोबस्त दिला आहे.सध्या धोकादायक परिस्थिती या ठिकाणी असल्याने याठिकाणी कोणीही फोटो काढण्यासाठी येऊ नये, अथवा स्टंटबाजी करू नये.

सचिन कल्याणशेट्टी, आमदार

 

तालुक्यातील पावसाची
आकडेवारी –

अक्कलकोट 36(375)
चपळगाव 33(436)
वागदरी 26(425)
किणी 29(477)
मैंदर्गी 20(373)
दुधनी 43(578)
जेऊर 28(303)
करजगी 27(282)
तडवळ 24(266)

एकूण -266mm(3515mm)
सरासरी प्रमाण -29.55(390.55)

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!