ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेस पक्षात आपल्या शब्दाला किंमत नाही ! काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची जाहीर नाराजी

इंदापूर : मागील काही वर्षापासून काँग्रेसमध्ये दुर्लक्षित असलेले, केंद्रीय गृहमंत्री पद भूषविलेले, सोलापूरचे काँग्रेसचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षातील सद्यस्थिती बद्दल अस्वस्थता व्यक्त केली आहे. ‘पूर्वी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती आता आम्ही कुठे आहोत?’ असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी पक्षातील आणि त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस पक्षात होत असलेली घुसमट इंदापूर येथे बोलून दाखवली. काँग्रेसची वैचारिक परंपरा संपत चालली आहे, असा खळबळजनक दावा शिंदे यांनी काल इंदापुरात बोलताना केला आहे.

सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी काँग्रेसमधील अस्वस्थता प्रकट केले. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये खळबळ उडाली आहे.

पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, 1974- 75 काळात काँग्रेसची वैचारिक शिबिरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे मात्र सध्या असे घडताना दिसत नाही. आम्ही कुठे आहोत हे पाहणे अवघड झाले आहे. काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच आपल्या शब्दाला पक्षात आता किंमत उरली आहे किंवा नाही अशी साशंकता त्यांनी बोलून दाखवली. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!