पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालय मध्ये दहावीची परीक्षा सुरू असतानाच एका विद्यार्थ्यावर भयंकर हल्ला घडला. सोमवारी सकाळी एका अल्पवयीन आरोपीने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. विद्यार्थ्याने वार हातावर झेलल्यामुळे मोठा अपघात टळला, मात्र तो जबर जखमी झाला.
ओतूर पोलीसांनी आरोपीसह इतर ४ जणांना ताब्यात घेतले असून, प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे. जखमी विद्यार्थ्यावर तातडीने औषधोपचार करण्यात आले, त्यानंतर त्याने रायटरच्या मदतीने परीक्षा पूर्ण केली.
महाविद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणाले की, घटना सकाळी १०.३५ वाजता घडली आणि त्या वेळी वर्गात कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. केंद्रात सुरक्षेसाठी पोलिस आणि आरोग्यकेंद्राचे दोन अधिकारी नियमित उपस्थित असतात. मुख्याध्यापकांनी पुढे सांगितले की, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हॉलतिकीट गेटवर तपासून शाळेत प्रवेश देण्याची व्यवस्था केली जाईल.
जखमी विद्यार्थ्याने सांगितले की, आरोपीने यापूर्वीही ६ मार्च रोजी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुख्याध्यापकांनी त्यावेळी असे काही घडले नसल्याचा दावा केला. ही घटना परिसरातील १३ शाळांचे परीक्षा केंद्र असलेल्या क्षेत्रात घडली, ज्यामुळे सर्व शाळांमध्ये सुरक्षा वाढवण्याची गरज भासली आहे.