मुंबई,दि.२४ : लेटरबॉम्ब आणि फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांना महाविकास आघाडीविरोधात १०० आरोपांचे निवेदन देण्यात आले. महाविकास विकास आघाडी सरकारमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. याबाबत संवैधानिक पध्दतीने तपास करण्याबाबतची मागणी भाजपच्याक शिष्टजमंडळाने राज्यपालांकडे केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार उपस्थीत होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यपालांना भेटून वेगवेगळ्या घटनांविषयी माहिती दिल्याचे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारकडून अहवाल घेतला पाहिजे, पोलीस दलात बदल्यांसाठी जे रॅकेट बाहेर निघाले आहे त्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला, काँग्रेसवर टिका करताना फडणवीस म्हणाले कि, काँग्रेस सध्या अस्तित्व हीन झाली आहे. काँग्रेसला माझा सवाल आहे कि, त्यांना या सरकारमध्ये किती हिस्सा आहे? ज्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.