ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.धस यांचा खळबळजनक दावा : माझा खून करण्यासाठी माणसे मुंबईत आणली !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सतीश भोसले हा हरिणाची शिकार करुन सुरेश धस यांना पुरवतो, असे बिष्णोई समाजाला सांगण्यात आले होते. तसेच माझा खून करण्यासाठी या समाजातील काही माणसांना राजस्थान वरुन विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. या लोकांना मला मारण्यासाठीच मुंबईत आणले असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. एका मराठी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धस यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरले होते. या संपूर्ण प्रकरणात राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यामुळेच मंत्री धनंजय मुंडे यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे. या सर्व घटनांदरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले या सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांवर देखील अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सतीश भोसलेला अटक देखील करण्यात आली. सतीश भोसले हा हरिणाची शिकार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या माध्यमातून आपल्याला जिवे मारण्याचा कट रचण्यात आला होता, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या माध्यमातून सुरेश धस हे हरणांचे मांस खात असल्याचे पसरवण्यात आले. त्यात राजस्थान मधून बिष्णोई समाजाची काही माणसे थेट विमानाचे तिकीट काढून मुंबईत आणण्यात आले. या माध्यमातून मला मारण्याचा कट रचण्यात आला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. बिष्णोई समाजाला सुरेश धस यांना हरणाचे मास कसे पुरवले जात होते, हे पटवून सांगण्यात आले होते, असे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक असलेले सुरेश धस यांना सतीश भोसले प्रकरणानंतर शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आता सतीश भोसले प्रकरणावरून सुरेश धस यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर पलटवार केला आहे. वाल्मीक कराड आणि त्याच्या गुंडांकडून जेलमध्ये महादेव गीत्ते आणि त्याच्या साथीदाराला मारहाण झाली असल्याचा आरोप देखील सुरेश धस यांनी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group