ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करताना मुलीचा अंत; पिंकी मालीची हृदयद्रावक कहाणी

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील फ्लाइट अटेंडंट पिंकी माली हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांपासून चार्टर्ड फ्लाइटमध्ये कार्यरत असलेली पिंकी आपल्या कर्तव्यावर असतानाच काळाच्या पडद्याआड गेल्याने तिच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

बारामती येथे बुधवारी सकाळी अजित पवार यांच्या प्रचारसभांसाठी चार्टर्ड विमानाने मुंबईहून सकाळी ८.१० वाजता उड्डाण केले होते. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच कोसळले व आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षा अधिकारी विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा जागीच मृत्यू झाला.

मंगळवारी संध्याकाळी पिंकीचे वडील शिवकुमार माली यांच्याशी तिचं शेवटचं बोलणं झालं होतं. “ती मला म्हणाली होती की, ती अजित पवारांसोबत बारामतीला जाणार असून त्यानंतर नांदेडला रवाना होणार आहे. सकाळी ती लवकर निघून गेली. टीव्हीवर विमान अपघाताची बातमी पाहिली आणि ब्रेकिंग न्यूजमध्ये माझ्या मुलीचं नाव ऐकू आलं, तेव्हा आम्हाला ती कायमची हरपल्याचं कळलं,” असे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी शिवकुमार माली यांनी सांगितले.

पिंकी विवाहित असून ती पतीसोबत पुण्यात राहत होती. तिचा पती खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. अपघाताची बातमी कळताच पुण्यातील तसेच वरळी येथील तिच्या निवासस्थानाबाहेर नातेवाईक व मित्रपरिवाराची गर्दी जमली.

पिंकीचे वडील शिवकुमार माली हे एकेकाळी दिल्ली विमानतळावर ड्रायक्लिनर म्हणून काम करत होते. १९८९ मध्ये पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या विमानाच्या स्वच्छतेदरम्यान झालेल्या एका चुकीमुळे त्यांची नोकरी गेली होती. त्या घटनेनंतर पिंकीने फ्लाइट अटेंडंट होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. “मी तुमचं स्वप्न पूर्ण करेन,” असं ती वडिलांना नेहमी सांगायची, मात्र नियतीने ते स्वप्न पूर्ण होत असतानाच हिरावून घेतलं. पिंकीच्या पश्चात बहीण प्रिती, भाऊ करण माली, पती तसेच मोठा कुटुंबीय वर्ग आहे. अपघाताची बातमी मिळताच तिच्या जौनपूरमधील वडिलोपार्जित गावात नातेवाईक आणि ग्रामस्थांची गर्दी जमली असून, सर्वत्र शोकमग्न वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!