ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गावोगावी शेतकर्‍यांची ‘गोपालक सेना’ उभी करणार ; आ.खोत यांचा इशारा !

सोलापूर : वृत्तसंस्था

देशी गोवंशाचे जतन करणारे खरे गोरक्षक शेतकरीच आहेत. ‘शो’ची कुत्री पाळणार्‍या शहरातील लोकांनी आम्हा शेतकर्‍यांना गाईवर प्रेम कसे करावे, हे शिकवू नये. तथाकथित गोरक्षक शेतकर्‍यांची गाडी अडवून त्यांची लूट करत आहेत. तुम्ही गोरक्षक नसून गोभक्षक आहात. आता आम्हीही गावोगावी शेतकर्‍यांची ‘गोपालक सेना’ उभी करणार आहोत, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी तथाकथित गोरक्षकांना दिला.

गोवंश हत्या आणि गोरक्षकाविरोधात शेतकरी, व्यापारी, पशुपालक कृती समितीचा सांगोला येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत 21 ऑगस्ट सांगोल्यात आले होते. खोत म्हणाले की, शेतकरी देशी गाईंना कधीच बाजारात विकायला आणत नाही. मात्र, दुधाळ जनावरे विक्रीला नेताना शेतकर्‍यांना अडवले जाते. तथाकथित गोरक्षक शेतकर्‍यांची गाडी अडवून त्यांची लूट करीत आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या गाई-म्हशींचा बाजार भाव मोठ्या प्रमाणात पडला आहे. पण, शेतकर्‍यांच्या जनावरांचे बाजार बंद करण्याचा डाव आम्ही चालू देणार नाही. कायदा हातात घेणार्‍या तथाकथित गोरक्षकांवर कडक कारवाई व्हावी.

पोलिसांनी कायद्याच्या गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करू नयेत. गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून एचएफ आणि होमिजीनाईजड पाश्चात्य आणि संकरीत बैल यांना कत्तलीची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी करताना शेतकर्‍यांच्या जनावरांच्या विक्रीत कोणीही अडथळा आणल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल. राज्यात देशी गाई, जर्सी, होस्टन अशा दुधाळ जातींची 1 कोटी 15 लाख, म्हैशीची संख्या 44 लाख, शेळ्या 90 लाख, मेंढींची संख्या 28 लाख असे एकूण 2 कोटी 85 लाख आहे. तर गोरक्षण छावण्यातील जनावरांची आकडेवारी जाहीर करून त्या ठिकाणी होणार्‍या गैरव्यवहारांवर कारवाई करण्यात यावी. जनावरांची कायदेशीर खरेदी-विक्री आणि वाहतूक पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!