ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.पवारांचा बच्चू कडू यांना सल्ला : तलवार म्यान करू नये

अमरावती : वृत्तसंस्था

अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी भाजपने नवनीत राणा यांना जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदार संघामध्ये नवनीत राणा यांच् याविरोधात उमेदवार देणार असल्याचे कडू यांनी जाहीर केले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या भूमिकेचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. तसेच आता त्यांनी आपली तलवार म्यान करू नये, असा सल्लाही दिला आहे.

नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. इतकेच नाही, तर नवनीत राणा यांच्याविरोधात आम्ही उमेदवार देऊ, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून त्यांना भूमिका कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात रोहित पवार म्हणाले की, ‘बाबासाहेबांचं संविधान आणि छत्रपतींचा स्वाभिमान या देशात जिवंत राहायला हवा, यासाठी आजची ही लढाई आहे. ही निवडणूक नसून लढाई म्हणून आम्ही स्वीकारू.” बच्चू कडू साहेबांची ही भूमिका सर्वसामान्य जनतेची भावना बोलून दाखवणारी आहे. देशभरात निवडणूक ही आता निवडणूक राहिलेली नाही तर जनतेची लढाई झालेली आहे आणि जेंव्हा जनताच निवडणूक हातात घेते तेंव्हा काय निकाल येतो ते कसबा पोटनिवडणुकीत आपण बघितलंय. तसाच निकाल 4 जूनलाही येईल यात काही शंका नाही.’

आपल्या पोस्टमध्ये आमदार रोहित पवार म्हणाले की, ‘मधला काही काळ बच्चू कडू साहेब भरकटले असले तरी उशिरा का होईना त्यांनी जागं होऊन जनतेची बाजू घेतली याबद्दल त्यांचे आभार. आता केवळ ‘सागर’ किंवा ‘वर्षा’वर बैठक होऊन तडजोडी करून त्यांनी झोपेचे सोंग घेऊ नये ही अपेक्षा! ते स्वाभिमानी आणि लढाऊ असल्याने देशाच्या संविधांनासाठी आणि छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी तरी ते इतरांप्रमाणे उपसलेली तलवारी म्यान करणार नाहीत, असा विश्वास वाटतो!’

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!