मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी निधन झाले आहे, असे वृत्त समोर आले आहे. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. कदम हे गेल्या दिड वर्षापासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी पद्मश्री आणि मुलगा गंधार कदम आहेत. त्यांच्या पार्थिवावर ओशिवारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कदम यांनी मराठी चित्रपट, मालिका, आणि नाटकांमधून कामे केली. खुमखुमी, टूरटूर, पोलीस नामा यासारख्या परंतु त्यांची इच्छा माझी इच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यातील भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे. हळद रुसली कुंकू हसलं, लावू का लाथ, चष्मे बहादुर या अनेक मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
रथचक्र, टुरटूर अशा नाटकांमधून त्यांनी आपली प्रतिमा उंच केली. विजय कदम यांनी १९८०च्या दशकात अनेक छोट्या-मोठ्या विनोदी भूमिका साकारल्या होत्या आणि तेथूनच त्यांच्या सिनेकारकीर्दीला सुरुवात झाली. अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. ही नाटके गाजली देखील. ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘टूर टूर’ ही नाटके प्रचंड गाजली. ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’व ‘आम्ही दोघ राजा राणी’ हे त्यांचे चित्रपटदेखील खूप गाजले.
सही दे सही, पप्पा सांगा कुणाचे, घरटे आमुचे छान, वासुदेव सांगती, खुमखुमी अशी नाटके त्यांच्या नावावर आहेत. ती परत आलीये या मालिकेतही ते दिसले होते. बाबुराव तांडेल ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती. विजय कदम यांनी ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बालनाटकात हवालदाराची भूमिका साकारली होती. पुढे आंतरशालेय आणि एकांकिका स्पर्धेत ते सहभागी होत. त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक ‘अपराध कुणाचा’ होते. स्वप्न गाणे संपले, खंडोबाचं लगीन अशी गाजलेली नाटके केली. या जागरण विधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणचा सर्वोत्कृष्ट लोकनाट्य अभिनेता हा पुरस्कार मिळाला.