ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गरम चहाचा घोट… आणि वाढतो कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक खुलासा

६५ अंशांपेक्षा जास्त तापमानातील पेय अन्ननलिकेला घातक; संशोधनातून धोक्याचा इशारा

भारतात चहा हे केवळ एक पेय नसून अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेक जण दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने करतात, तर काहींना दिवसभरात अनेकदा चहा पिण्याची सवय असते. मात्र, अतिशय गरम चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दीर्घकाळ ही सवय कायम राहिल्यास भविष्यात कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, धोका चहा किंवा कॉफीमुळे नसून त्या पेयांच्या तापमानामुळे निर्माण होतो. जेव्हा अतिशय गरम चहा, कॉफी, सूप किंवा गरम अन्न सेवन केले जाते, तेव्हा त्याचा थेट परिणाम अन्ननलिकेवर होतो. अशा गरम पदार्थांमुळे अन्ननलिकेच्या आतील नाजूक आवरणाला वारंवार इजा पोहोचू शकते. या सततच्या इजेमुळे इसोफेगस स्क्वॅमस सेल कार्सिनोमा नावाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. हा कर्करोग अन्ननलिकेच्या आतील पेशींमध्ये विकसित होणारा गंभीर आजार मानला जातो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या विविध संशोधनांनुसार, जर एखाद्या पेयाचे किंवा अन्नाचे तापमान ६५ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे इंटरनॅशनल एजन्सी फॉर कॅन्सर रिसर्च (IARC) ने अतिशय गरम पेयांना ग्रुप २ए कार्सिनोजेनिक श्रेणीत समाविष्ट केले आहे. याचा अर्थ असा की, अतिशय गरम पेय तात्काळ कॅन्सर निर्माण करत नाहीत; मात्र दीर्घकाळ अशी सवय कायम राहिल्यास भविष्यात कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते.

कसा घ्याल बचाव?

  • पेय थोडे थंड होऊ द्या: चहा किंवा कॉफी कपात ओतल्यानंतर लगेच न पिता काही मिनिटे थांबावे.

  • वाफ कमी झाल्यावरच प्या: पेयाचे तापमान थोडे कमी झाल्यावरच त्याचे सेवन करणे योग्य.

  • गरम अन्न टाळा: अतिशय गरम सूप, दलिया किंवा जेवण लगेच खाणे टाळावे.

  • सवय बदला, चहा नाही: चहा पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. फक्त तो खूप गरम असताना पिणे टाळणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, आरोग्यदायी सवयींचा अवलंब केल्यास छोट्या बदलांमुळे मोठे आजार टाळता येऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!