सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर अनेक जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडत असल्याचे चित्र असताना आता सोलापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी काँग्रेसच्या स्थानिक खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत आघाडी करण्यास साफ नकार दिला आहे. विधानसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही आघाडी करणार नाही. सोलापुरात आघाडी तुटली तरी चालेल, असे ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बेबनावर निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद कोळी याविषयी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत गद्दारी केली. त्यामुळे आमची युती तुटली तरी चालेल, पण आम्हाला त्यांचे नेतृत्व मान्य नाही. आम्ही त्यांच्याशी आघाडी करणार नाही. प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे अवमान केला. महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात अपयशी ठरल्या. त्यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून आघाडीला मातीत व गाळात नेऊन ठेवले.
प्रणिती शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मतांसाठी झोळी पसरली. त्यानंतर त्या खासदार झाल्या. त्या आज मोठेपणा दाखवतात. पण त्यांना शिवसेनेमुळे आपण खासदार झाल्याचे भान राहिले नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्वतः सांगितले होते की, तुम्ही शिवसेनेमुळे कासदार झाला आहात, आघाडीचा धर्म पाळा. पण त्यांनी तो आदेश पाळला नाही. त्यामुळे त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत. शरद कोळी यांनी यावेळी ठाकरे गटाला काँग्रेससोबत आघाडी करण्यात कोणतीही हरकत नाही, पण आम्हाला प्रणिती शिंदेंचे नेतृत्व मान्य नाही, असेही ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधानामुळे सोलापुरात काँग्रेस व ठाकरे गटातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत.