सोलापूर – कोरोना जागतिक महामारीचा फटका सबंध उद्योग विश्वाला बसला आहे. याचाच परिणाम सोलापुरातील टेक्सटाईल व गारमेंट उद्योगाला झाला असल्याने सोलापुरातील उद्योजक कामगार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापुरात नावारूपास येणाऱ्या गारमेंट उद्योगाला कोरोना महामारीतून बाहेर काढत सध्या भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी गारमेंट उद्योगास भेट दिली.याप्रसंगी गारमेंट उद्योगाशी निगडित सर्व समस्या येत्या संसदीय अधिवेशन काळात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी दुपारी सोलापूर अक्कलकोट रोड वरील एमायडिसी मधील सर्व गारमेंट उद्योजकांची कामगारांची भेट घेत समस्या जाणून घेण्यासाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी भेट देत परिस्थितीची माहिती करून घेतली. यावेळी उद्योजक रवींद्र मिणियार, अमित जैन यांच्यासह गारमेंट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला सोलापुरातील गारमेंट उद्योगात असलेली ताकद व जगभरात मिळत असलेला नावलौकिक याबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर सोलापूर गारमेंट असोसिएशनचे पदाधिकारी अमित जैन यांनी सोलापूर गारमेंट उद्योगाला कोरोना महामारीचा फटका कशा पद्धतीने बसला आहे कामगारांच्या व उद्योगांच्या समस्या विस्तृतपणे मांडल्या. गारमेंट उद्योगाच्या मार्केटिंगसाठी अधिकाधिक भर दिल्यास मोठ्या प्रमाणात मागणी वाढेल. सध्या हजारो कामगारांना काम नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुशल कामगारांना देखील बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. तसेच उद्योजकांना बँकांचे कर्ज, कामगारांच्या आर्थिक गरजा, इतर खर्च यांचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री, केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री यांच्यासह विविध मंत्रालयाकडून मोठी मदत मिळणे अपेक्षित असल्याचेही आम्ही जैन यांनी सांगितले. सोलापूर गारमेंट विश्वाचा सर्व प्रथम संसदेत उल्लेख करून सोलापूरचे नाव अधोरेखित करण्यासाठी खा. महास्वामी यांनी संसदेत विषय मांडल्याबद्दल त्यांचे विशेष आभार ही गारमेंट उद्योजकांनी मानले.
सोलापुरातील गारमेंट उद्योजकाच्या प्रश्नाबरोबरच कुशल कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांची रोजीरोटी चालण्यासाठी मी कायम आपल्या सोबत आहे. या समस्या सोडविण्यासाठी येत्या संसदीय अधिवेशन काळामध्ये संबंधित सर्व मंत्रालयामध्ये सोलापूर गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह विशेष बैठकीचे आयोजन करणार आहे. गारमेंट उद्योगाला आधार देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले. तसेच गारमेंटशी निगडीत असलेल्या उद्योगाच्या बाबतीत ही सोलापूरमध्ये उद्योग वाढण्यासाठी यापुढे एकसंघ पणे नक्कीच प्रयत्न करू असेही खा. महास्वामींनी सांगितले.