ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता ; शाळांना आज सुट्टी, इंटरनेट सेवा बंद

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी शहरात तणाव निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अंबरनाथ-कर्जत मार्गावरील लोकल सेवा मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सुरु झाली. बदलापूरमध्ये सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येथील तणाव निवळला आहे. दरम्यान, बदलापूरमधील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई आज बदलापूर येथे येणार आहेत. ते दुपारी १ वाजता पोलीस स्थानकाला भेट देतील. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर सायंकाळी ४ वाजता पालकांची भेट घेणार आहेत. मध्य रेल्वेचे डीसीपी, जीआरपी, मनोज पाटील यांनी सांगितले की, ” येथील परिस्थिती सामान्य आहे. रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे.”

या घटनेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या सुमारे ३०० लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी ४० हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणावरून मंगळवारी उद्रेक झाला. संबंधित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत पालक आणि आंदोलकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. त्यातच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केल्यामुळे संतापाचा कडेलोट झालेले पालक आणि आंदोलकांकडून शाळेत मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला. आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी बचावासाठी लाठीचार्ज केला. तसेच अश्रूधुराची नळकांडी फोडण्यात आली. दरम्यान, शालेय मुलींवरील अत्याचाराच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!