सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील बाजार चौकात असलेल्या आकाश फुटवेअरला बुधवारी मध्य रात्रीनंतर लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या घटनेत बाजूची दोन दुकानेही जळाली. आकाश फुटवेअर व त्याच्या तीन मजली घरातील चप्पल, बूट, फर्निचर व रोख रक्कम जळाल्याने अंदाजे ३० ते ४० लाखाचे नुकसान झाले. मंद्रुप येथील मुकेश कांबळे यांचे बाजार चौकात आकाश फुटवेअर दुकान आहे. तसेच तम्पाण्णा जोडमोटे यांचे महालक्ष्मी बोरवेल व अरविंद म्हेत्रे यांचे मोबाईल दुकान आहे. बुधवारी मध्यरात्री एक दुकानाला लागलेल्या आगीत तीनही दुकाने जळून खाक झाली.
सोलापुरातील अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी दोन तास प्रयत्न केल्यानंतर आग विझवण्यात यश आले. यामध्ये तीन मजली इमारतीतील संपूर्ण फुटवेअर जळाले असून अंदाजे ३० ते ४० लाख रूपयेचे नुकसान झाल्याचे कांबळे यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनूरे यांनी घटनास्थळी भेट देऊन कांबळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. मंद्रुप पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.