ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राहुल गांधींच्या विश्वासातील नेते शिंदे गटात दाखल

मुंबई : वृत्तसंस्था

राहुल गांधी यांच्या विश्वासातील नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी अखेर काँग्रेसचा हात सोडला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेतील १० माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी जाहीर प्रवेश केला, राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेला रविवारपासून सुरुवात होत असतानाच काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

दोन लोकसभा निवडणुकांत भाजप- शिवसेना युती राहिल्याने दक्षिण मुंबई मतदारसंघात खासदार अरविंद सावंत यांचा सहज विजय झाला. मात्र यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची युती नसल्याने या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास मिलिंद देवरा पुन्हा एकदा उत्सुक होते. मात्र महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जात असल्याने मिलिंद देवरा हे नाराज होते.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेत देवरा यांनी आपली भूमिका मांडली होती. अखेर देवरा यांनी रविवारी सकाळीच एक्सवरून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला. रविवारी दुपारी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी सपत्नीक गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर कुलाबा येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आणि वर्षा बंगल्यावर आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!