ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आरोपी शरण आला, टीका करणे योग्य नाही ; बावनकुळेंचे वक्तव्य !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यभर गाजत असलेले बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी आज सामूहिक जलसमाधी आंदोलन पुकारलं. असून त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ वक्तव्य केले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, आरोपी शरण आल्यानंतर टीका करणे योग्य नाही. बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते, ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मस्साजोग ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनावर प्रतिक्रिया देत सरकारवर विश्वास ठेवावा, अशी विनंती मस्साजोगच्या ग्रामस्थांना केली.

बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड 22 दिवसांपासून फरार होता. तो मंगळवारी पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला. फरार आरोपीला अटक न होता, तो स्वतःहून शरण आल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

एखादा आरोपी शरण येत असेल आणि तपास पुढे जाणार असेल, तर त्यावर टीका करणे योग्य नाही. कालपर्यंत आरोपीला पकडत नाही, असे म्हणत होते. आता तो शरण आला, तर त्यावरही टीका करतात, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना लगावला. तपास यंत्रणांवर कोणतेही दडपण येणार नाही, असेही ते म्हणाले. बीडच्या प्रकरणातील कोणताही आरोपी सुटणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, असे ते म्हणाले. योग्य पद्धतीने पुरावे, चार्जशीट तयार करावे लागते. गुन्हा दाखल करण्यापेक्षा तो पूर्णपणे निकाली निघणे महत्त्वाचे आहे. सर्व तपास यंत्रणांच्या माध्यमातून जे पुरावे येतील, त्यातून आरोपीला शिक्षा होईल. तपास असा व्हावा की, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. म्हणून सरकारला काही वेळ लागतो. तो द्यावा लागतो, असे बावनकुळे म्हणाले.
कोणत्याही प्रकरणात काय कारवाई झाली, सरकारने काय पुढाकार घेतला, हे आमदारांनी जाणून घेतले पाहिजे. तपासात काही आणखी अॅडिशन करायचे असेल, तर मीडियामध्ये बोलण्यापूर्वी मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांशी त्याबाबत चर्चा करायला हवी. यातून चांगले मार्ग निघू शकतात. योग्य तपासही होऊ शकतो, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना अप्रत्यक्षपणे सल्ला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!