ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अभिनेता सलमान खानवर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : वृत्तसंस्था

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या आरोपीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या वांद्रे स्थित घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अनुज थापन व सोनू चंदर या दोघांना अटक केली होती. यापैकी अनुज थापन याने बुधवारी तुरुंगात चादरीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला लगतच्या रुग्णालयात हलवले. तिथे त्याची प्रकृ्ती गंभीर असल्याची माहिती आहे. अनुज थापन याच्यावर हल्लेखोरांना शस्त्र उपलब्ध करून देण्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकत्याच्या त्याच्या पंजाब येथून मुसक्या आवळल्या होत्या.

सलमानच्या घरावर गत 14 एप्रिल रोजी पहाटे 4.15 च्या सुमारास 2 दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. हल्लेखोरांनी एकूण 4 गोळ्या सलमानच्या बंगल्याच्या दिशेने झाडल्या. त्यापैकी एक गोळी घरात शिरली, तर उर्वरित गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या. पोलिसांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आपला तपास सुरू केला होता. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी गुजरात व पंजाबमधून प्रत्येकी 2 अशा एकूण 4 जणांना अटक केली होती. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सलमानच्या घरी जाऊन स्थितीचा आढावा घेतला होता. तसेच घटनेचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शासन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!