सोलापूर : प्रतिनिधी
मावा, मटका, गांजा, गुंडगिरी आणि व्याजबट्टाच्या त्रासाला वैतागून सोलापुरात मोठे उद्योजक गुंतवणूक करायला तयार होत नसून त्याचा विपरित परिणाम सोलापूरच्या अर्थकारणाला झालेला आहे. ह्या सर्व त्रासाला कंटाळून सोलापूरच्या उच्चशिक्षित तरुणांना नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने कायमस्वरूपी सोलापूर सोडून जावे लागत आहे. सोलापुरात अनधिकृत बेकायदेशीर टोलेजंग बॅनर्समुळे सोलापूरचे विद्रुपीकरण होत असून, ह्या कारणाने शहरात पर्यटक येण्यास घाबरत असल्याचे दहशतीचे वातावरण सोलापुरात सध्या निर्माण झाले आहे. ह्या सर्व गोष्टींवर शहर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून आपल्या कार्यकाळात ह्या सगळ्यांवर अंकुश ठेवण्याची मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मिरवणूक आणि त्या दरम्यान होत असलेल्या ध्वनिप्रदूषण संदर्भ स्पष्ट आणि कडक आदेश असूनही त्यासंदर्भात सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने कोणत्याही प्रकारची कडक कारवाई होताना दिसून येत नसल्याने सोलापुरात दिवसागणिक मिरवणुकीं दरम्यान उच्छाद वाढत असून त्याचा नाहक त्रास सोलापूरकरांना सोसावा लागत आहे.
मावा, मटका, अमली पदार्थ तथा अवैध व्यवसायांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सोलापुरातुन गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आम्ही सोलापूरकर आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे असून आपल्या खात्याच्या वतीने कडक कारवाई करुन सोलापूरला शिस्त लावण्याची गरज असल्याचे मत सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले. सोलापुरातील सामन्य जनता कायदा, सुव्यवस्था, नियम पाळणारे तथा शांतताप्रिय लोक असून गेल्या काही वर्षांत सोलापूरची प्रतिमा देश विदेशात अशा अप्रिय गोष्टींमुळे निगेटिव्ह झाली असून, सोलापूर विकास मंचच्या वतीने ती प्रतिमा उंचावण्यासाठी आम्ही अहोरात्र कार्यरत असल्याची माहिती सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना देण्यात आली. सोलापूर विकास मंचच्या ह्या मोहिमेस सोलापुरातील विविध संस्था, संघटना आणि व्यक्तिंचा सक्रिय पाठिंबा असल्याची माहिती ह्यावेळी पोलीस आयुक्तांना मंचच्या सदस्यांनी दिली. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, अॅड. दत्तात्रय अंबुरे, विजय कुंदन जाधव, गणेश शिलेदार, प्रसन्न नाझरे, अॅड. प्रमोद शहा, संजय खंडेलवाल, आरती अरगडे, इक्बाल हुंडेकरी, सादिक वळसंगकर, सुशीलकुमार व्यास आदी सदस्य उपस्थित होते.