छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक आरोप प्रत्यारोप करीत असताना आता सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी मतदारांना आवाहन केले आहे. सध्या आपल्या अवतीभोवती जे पाहून दुःख होते. मी कधीच जात-धर्म मानत नाही. काही चालू आहे ते मात्र, काही राजकीय शक्ती जाती-धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. या लोकांना तुम्ही मतदानाद्वारे उत्तर द्या, असे आवाहन सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी आंतरविद्यापीठीय सेंट्रल झोन युवा महोत्सवात विद्यार्थी कलावंतांना उद्देशून केले.
छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम विद्यापीठात असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज ३९ व्या आंतरविद्यापीठीय सेंट्रल झोन युवा महोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली. सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, विश्वस्त भाऊसाहेब राजळे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, एआययूचे अधिकारी डॉ. निर्मल जौरा, दीपक कुमार झा, महोत्सवाचे सचिव डॉ. शिव कदम उपस्थित होते.
नाना पाटेकर म्हणाले, आपण स्वतःकडे बघायला पाहिजे. स्वतः तील उणिवा आपल्याला समजणे आवश्यक आहे. हे एकदा समजले की, आयुष्य सोपे होऊन जाते. आजपेक्षा उद्या कसे उत्तम होता येईल, याचा विचार करत पुढे जाणे आवश्यक आहे. बदल जर कोणी करू शकेल तर ही देशाची तरुणाई करेल, यावर मला विश्वास आहे. आपण जागरूकपणे पुढे जात असताना गर्दीचा भाग बनू नका. आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल असून, ते तुमच्या हातात आहे. जे काही करायचे आहे ते मनातून करायचे. जगात कोणतीही क्रांती झाली आहे त्याची सुरुवात रंगमंचावरून झालेली आहे. आज आपल्या आजूबाजूला राजकीय, सामाजिक जे काही सुरू आहे त्यावर आपण आपल्या अभिनयाने भाष्य करू शकतो. ५० वर्षे झाली या क्षेत्रात काम करत असूनही मी स्वतःला कलाकार म्हणत नाही, कारण आणखी मला खूप काही शिकायचे असल्याचे नाना पाटेकर यावेळी म्हणाले.