नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चंदिगड भाजपच्या नवनिर्वाचित खासदार तथा बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला चंदिगड विमानतळावर मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. विमानतळावर तैनात ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल’च्या (सीआयएसएफ) महिला कॉन्स्टेबलने कथितरीत्या कंगनाच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेवर कंगनाने तीव्र संताप व्यक्त केला.
माझ्या चेहऱ्यावर चापट मारत मला शिवीगाळ करण्यात आली. सध्या मी सुरक्षित आहे, पण पंजाबमधील दहशतवादाविषयी चिंतीत आहे, अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून ७४ हजार मतांनी विजयी झालेल्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतशी चंदिगड विमानतळावर गैरवर्तनाचा प्रकार घडला आहे. या ठिकाणी तपासणी करीत असताना कर्टन रूममध्ये सीआयएसएफची महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने कंगनाच्या श्रीमुखात भडकावली. यावेळी कंगनासोबत असलेल्या सहप्रवाशाने पलटवार करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कु लविंदर कौरला ताब्यात घेण्यात आले. कर्टन रूममध्ये कुलविंदरने वाद घातल्याचा आरोप कंगना राणावतने केला. मला का मारहाण केली जात आहे? अशी विचारणा केली असता आपण शेतकरी आंदोलनाचे समर्थक असल्याचे कुलविंदर कौरने सांगितल्याचे कंगना म्हणाली. या घटनेवरून कंगनाने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर महिला कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करीत तिला निलंबित करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कंगना राणावत आता दिल्लीत दाखल झाली आहे.