ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अदानी एंटरप्रायजेसकडून वीसहजार कोटींचा एफपीओ रद्द, गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार

मुंबई : अदानी समूहाने नुकतेच इपीओ जारी केले होते. यामध्ये ३१ जानेवारीपर्यंत गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यासाठी संधी देण्यात आली होती. मात्र बुधवारी एफपीओ मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. अदानी समूहाने पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचे सांगितले आहे.

गौतम अदानी यांनी एक व्हिडिओ शेयर करुन समुहाची बाजू मांडली आहे. ते म्हणाले, बाजारातील अस्थिरतेमुळे आमच्या व्यवस्थापकीय मंडळाने निर्णय घेतला की, सध्या या एफपीओसोबत जाणे उचित ठरणार नाही. हिडनबर्गच्या वादानंतर गौतम अदानी पहिल्यांदा समोर आले आहेत. अदानी एन्टरप्राईजेसचा एफपीओ २७ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुला होता.

गौतम अदानी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, प्रिय गुंतवणूकदार एफपीओ पुर्णपणे सबस्क्राईब होऊनही तो रद्द करण्याच्या निर्णयामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. बाजारातील अस्थिरतेच्या स्थितीत एफपीओ दाखल करणे नैतिकतेच्या मुद्दयावर योग्य ठरणार नाही. ते म्हणाले, एक व्यावसायिक म्हणून गेल्या ४ दशकांपासून मला माझ्या गुंतवणूकदारांकडून चांगला पाठिंबा मिळाला आहे. मी माझ्या आयुष्यात काहीतरी कमावले आहे. माझ्या यशाचे क्रेडिट मी त्यांना देऊ इच्छितो. त्यामुळेच मी एफपीओ मागे घेण्याचा निर्णय़ घेतला आहे. एफपीओ मागे घेतल्यामुळे कंपनीच्या कामावर काहीही परिणाम होणार नाही. भविष्यातील योजनांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही. असेही त्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे वचन :
कंपनीने २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ जारी केला होता. हा एफपीओ २७ जानेवारीला उघडला होता. तर ३१ जानेवारीला त्याची क्लोजिंग डेट होती. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अदानी ग्रुपने अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि गुंतवणूकदारांना त्यांचे सर्व पैसे परत करणार असल्याचे वचन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!