सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सुमारे ३ हजार महिलांचे ‘आदिशक्ती महिला संमेलन’ रविवारी (दि. १७) सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होत आहे. महिलांनी एकत्रित येऊन विचार करावा, मातृशक्तीचा आदर करत एक विचाराने काम करता यावे, यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजिका गायत्री सुमंत, देवयानी देशमुख, अश्विनी चव्हाण यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये हे संमेलन होईल. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, भारतीय स्त्री शक्ती राष्ट्रीय संघटन प्रमुख माधुरी साकुळकर यांचे ‘सशक्त स्त्री, सशक्त समाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यानंतर ‘महिलांची वर्तमान परिस्थिती समस्या आणि समाधान’ या विषयावर गटचर्चा होईल. संस्कृत भारतीच्या कोल्हापूर विभागप्रमुख स्वाती देशपांडे यांच्या ‘विकसनशील देशात स्त्रीचे स्थान’ या व्याख्यानाने संमेलनाचा समारोप होईल. या वेळी गायत्री सुमंत, गौरी आमडेकर, देवयानी देशमुख, निवेदिता कासवा, अपर्णा महाशब्दे, विद्या एकबोटे, अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होत्या