सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणूक यंदा दिवाळीनंतर होणार असल्याचे चित्र असल्याने सरकारने यंदाची दिवाळी लाडक्या बहिणींना गोड केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत २.५२ कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील दोन कोटी ४१ लाख ३५ हजार महिलांचे अर्ज पात्र ठरले असून त्यांच्यासाठी दरमहा ३६२० कोटींची गरज आहे. आतापर्यंत एक कोटी ८५ लाखांहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. विधानसभा आचारसंहितेची शक्यता असल्याने सध्या जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या पात्र अंदाजे दीड कोटी महिलांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर, नोव्हेंबरचे ॲडव्हान्स हप्ते (प्रत्येकी तीन हजार) दिले जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे दौरे पाहता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरदरम्यान जाहीर होईल, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचेही कार्यक्रम होत आहेत.
उद्या (मंगळवारी) सोलापूर जिल्ह्यासाठी कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर अपेक्षित असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर योजनेतील लाभार्थींना त्या काळात पैसे द्यायला अडथळा येवू शकतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचेही दोन हप्ते आताच दिले जात आहेत. योजना सुरु झाल्यापासून जुलै ते नोव्हेंबर या काळातील साडेसात हजार रुपये महिलांना मिळाल्याने सध्या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढविण्याचे सरकारने जाहीर केले, पण त्याचा लेखी आदेश नसल्याने अद्याप लाभार्थींना अर्ज करता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
राज्यातील नगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, ठाणे, यवतमाळ या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सात ते २० लाखांपर्यंत महिलांनी अर्ज केले आहेत. आतापर्यंत एकूण अर्जदारांपैकी एक कोटी ८५ लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात योजनेच्या लाभाची रक्कम जमा झाली आहे. पण, अद्याप जवळपास ६५ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात एक रुपया देखील जमा झाला नसल्याची वस्तुस्थिती आहे.